फलटण चौफेर, दि. १५ सप्टेंबर २०२५
सलग १५ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या मुसळधार पावसाने फलटण तालुका अक्षरशः जलमय झाला आहे. तालुक्यातील अनेक भागांत नद्या, नाले,ओढे पाण्याने भरून वाहत असून शेतजमिनी व वस्ती भागात पाणी साचले आहे.
नीरा खोऱ्यातील सर्व धरणे १०० टक्के भरली असल्याने वीर धरणातून नीरा नदीत ७,२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे खालील प्रवाह क्षेत्रातील गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची आठवण करून देणारा हा पाऊस नागरिकांसाठी चिंता वाढवणारा ठरला आहे.दरम्यान, काल रविवारी साखरवाडी गावचा साप्ताहिक आठवडा बाजाराच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने भाजी विक्रेत्यांना व नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले. बाजारात आलेली भाजीपाला मालमत्ता ओलाव्याने खराब झाली तर पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
शेतकरी वर्गावर या पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेतात काढणीस आलेली सोयाबीन व बाजरीची पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. पिकांवर उभे पाणी साचल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले असून, शाळकरी मुलांपासून कामगार वर्गापर्यंत सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे.